गुन्हेगारीवर वचक ठेवणारा अधिकारी हवा; कोपरगावकरांच्या अपेक्षा वाढल्या
कोपरगाव प्रतिनिधी संदीप विदुर – कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या बदलीनंतर आता त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत शहरात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. कोपरगाव हे राजकीय, सामाजिक आणि व्यापारीदृष्ट्या संवेदनशील शहर असल्याने येथे धाडसी, अनुभवी आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेल्या अधिकाऱ्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

गेल्या काही काळात शहरात वाढणारे अवैध धंदे, वाहतुकीच्या समस्या, गुन्हेगारीच्या बदलत्या घटना आणि कायदा-सुव्यवस्थेची आव्हाने लक्षात घेता नव्या अधिकाऱ्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. विशेषतः नागरिकांमध्ये राकेश मानगावकर, वासुदेव देसले, गोविंद पवार आणि वाय. डी. पाटील यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि कठोर प्रशासनासाठी ओळखल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे.
पोलीस ठाण्यात बसून कारभार करणाऱ्या नव्हे तर रस्त्यावर उतरून गुन्हेगारांवर वचक निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्याची गरज असल्याचे मत सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न, अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणि नागरिकांशी थेट संवाद साधणारा अधिकारी कोपरगावला मिळावा, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, नियुक्तीबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी पोलीस विभागातील हालचालींना वेग आला असून विविध नावांची चर्चा रंगत आहे. कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळ, व्यापारी संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोपरगावला आता केवळ पोलीस निरीक्षक नको, तर शहरावर प्रभावी वचक ठेवणारा आणि गुन्हेगारांच्या मनात धाक निर्माण करणारा अधिकारी हवा, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.







